August 6, 2020

बौध्द ‘ हा धम्म (धर्म) आहे. जात नव्हे तरी बौध्दांना जातीचा दाखला (Caste-Certificate)का?

`” ” बौध्द ” हा धम्म (धर्म) आहे. जात नव्हे तरी बौध्दांना जातीचा दाखला (Caste-Certificate) का ? असा प्रश्न सतत मनात उदभवत असतो.
” माझ्या बौध्दधर्म ग्रहणानंतर मी अस्पृश्य राहणार नाही. ” असे वक्तव्य१८ मार्च १९५६ रोजी आग्रा येथील एका सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.तरीपण जातीचा त्याग केल्यानंतर जातीवर आधारित असलेल्या सवलती बौध्दधम्म स्वीकारलेल्या लोकांना मिळणार नाहीत हे ओघानेच आले, त्याचमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्दधम्मदीक्षानंतर दुसऱ्या दिवशी १५ आक्टोबर १९५६रोजी केलेल्या भाषणात जे विवेचन केले आहे ते असे- ” आम्ही बौध्द धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळविन याची बालंबाल खात्री आहे. मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही.या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल.आम्‍ही बौध्द धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल. याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय भरलेले आहे. ते काय प्रकारचे आहे ते मला पूर्ण माहीत आहे.हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे; आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे. ”
वरील भाषणात बाबासाहेबांचा जबरदस्त आत्मविश्वास पाहता बाबासाहेबांनाही वाटले नसेल की आपल्या जीवनातील चळवळीचा अंतिम टप्पा म्हणजेच बौध्द जीवनमार्ग साधला असता आणि ह्या जीवनमार्गाचा अभ्युदय, उत्कर्ष न पाहता आपली जीवनयात्रा अचानक संपेल.
आपले दुर्दैव म्हणावयाचे की दीक्षा समारंभानंतर अवघ्या ५०दिवसाच्या अंतराने बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखालील बौध्द जीवनमार्गाच्या अभ्युदयापासून, उत्कर्षापासून पोरके व्हावे लागले. यातलीच एक समस्या म्हणजे बौध्दांच्या सवलती. सवलती म्हणजे मेहेरबानी नव्हे. सवलती म्हणजे घटनात्मक हक्क किंवा घटनात्मक संरक्षण.{Constitutional Safeguard}

महाराष्ट्रात बौध्दांच्या सवलती संबंधात मागणी होत राहिल्यामुळे आणि काँग्रेसलाही आंबेडकर अनुयायांची सहानुभूती मिळवावयाची होती म्हणून महाराष्ट्र सरकारने सवलती देण्यास अनुकूलता दाखविली. महाराष्ट्र सरकारकडून जो जातीचा दाखला दिला जात होता त्यातला मजकूर असा होता.
This is to certify that ————————– of ———belongs to Buddhist faith. Before conversion to Buddhism his/her parent’s belonged to Mahar Community, which is recognised as a Scheduled Castes under Scheduled Castes and Scheduled Tribes Order (Amendment) Act, 1976 as adopted for Maharashtra,vide Bombay Re-organisation Act, 1960


ह्या सर्टिफिकेटमध्ये बौध्द हे शेड्यूल्ड कास्ट आहेत असे नमूद करण्यात आलेले नाही.तर जे बौध्द झाले आहेत ते पूर्वी महार जातीचे होते आणि ती जात शेड्यूल्ढ कास्ट म्हणून ओळखली जाते असे नमूद केले आहे, १९९० नंतर जे कास्ट सर्टिफिकेट दिले जाते त्यात बौध्द हे शेड्यूल्ड कास्ट आहेत असे नमूद करण्यात आले आहे. हा घातक बदल ज्या कायद्यामुळे झाला आहे तो कायदा काय आहे आणि त्या कायद्याविषयी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत नेते,पुढारी म्हणून मिरविणाऱ्यांचे काय म्हणणे होते तेही पाहिले पाहिजे.


व्ही.पी.सिंग पंतप्रधान असतांना बौध्दांना सवलती देण्यात आल्या. पण त्यात त्यांनी ग्यानबाची मेख मारून ठेवली आहे. ती अशी- ४ जून १९९० रोजी भारत सरकारच्या राजपत्रातील दुसऱ्या भागातील खंड १ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या निर्णयाद्वारे अनुसूचित जातीसंबंधी घटना आदेश १९५० च्या परिच्छेद क्रमांक ३ मध्ये बदल करून हिंदु व शीख धर्मियांप्रमाणे बौध्द धर्मियांनासुध्दा अनुसूचित जातीचा दर्जा देण्यात आला.


याचाच अर्थ हा आहे की, अनुसूचित जातीतून बौध्द धम्म स्वीकारला म्हणून नव्हे तर बौध्द धम्म स्वीकारून सुध्दा बौध्द अनुसूचित जातीचेच आहेत या भूमिकेतून केंद्र सरकारने विशेषत: व्ही.पी. सरकारने या सवलती बौध्दांना दिल्या.
१३ आक्टोबर १९५६ रोजीच्या वृत्तपत्रकारांच्या मुलाखतीत ज्यावेळी बाबासाहेबांना वृत्तपत्रकारांनी प्रश्न केला की,धर्मांतराने सवलती जातील,त्याविषयी काय? त्यावर बाबासाहेब म्हणाले, ” घटनेने दिलेल्या खास सवलतींचा लाभ उठविता याचा म्हणून आम्ही सदा सर्वकाळ अस्पृश्यच रहावे, असे तुम्हाला वाटते काय? ” त्यामुळे बाबासाहेबांना हा कायदा मान्य झाला असता का असा सहज मनी प्रश्न निर्माण होतो.
ॲड.बी.सी.कांबळे यांनी मधु दंडवते यांच्याशीही कार्यकर्त्यांमार्फत संपर्क साधला.कारण व्ही.पी,सिंग यांच्या सरकारमध्ये मधु दंडवते रेल्वेमंत्री होते. मित्र पक्षाचे ते नेते होते.पण मधु दंडवते यांनीही असा शेरा मारला की, `कशाला किस काढता? जे मिळाले आहे ते घ्या. ‘


ॲड.बी.सी.कांबळे यांनी ०६ डिसेंबर १९९१ रोजी पुस्तिका लिहून व्ही.पी.सिंग सरकारने ०४ जून १९९० रोजी पार्लमेंटमध्ये पारित केलेल्या बौध्दांच्या बाबतीत कायद्याचे- बौध्दांना पुनश्च अस्पृश्य बनविण्याचे- खरे रूप उघड करून दाखविले आहे.
या लेखाच्या शेवटी ०४ जून १९९० च्या पूर्वी महाराष्ट्र सरकारच्या कास्ट सर्टिफिकेटची आणि ०४ जून १९९० नंतरच्या कास्ट सर्टिफिकेटची तसेच ॲड.बी.सी.कांबळे यांनी लिहिलेल्या पुस्तिकेच्या पुढील व मागील पानांची इमेज आहेत.

-लेखक:-एच.बी.जाधव,केंद्रीय सेक्रेटरी (आरपीआय-कांबळे)

तुमच्या कडे जर असे लेख असतील आणि तुम्हाला ते पब्लिश करायचे असतील आम्हाला खालील इमेल वरती नक्की पाठवा

  • ta.news358@gmail.com
loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *